मंगळवार, ६ जानेवारी, २०१५

लोकराज्य चे रामराज्य होणार काय ?नवा गडी नवा राज. मोदींनी योजना आयोगाचे नाव बदलून नीती आयोग ठेवले. खरा म्हणजे ते योजना आयोग मोडीतच काढणार होते पण शाहीस्तेखानासारखे योजना आयोगाचे जीवावरचे बोटावर निभावले. योजना नावाचे एक योजना ( सॉरी नीती आयोगा) चे मासिकही अनेक भारतीय व इंग्रजी भाषेत निघते, त्याचेही नामांतर होईलच. महाराष्ट्र सरकारचे सुद्धा ' लोकराज्य ' नावाचे मुखपत्र प्रसिध्द होते. एक दर्जेदार प्रकाशन म्हणून त्याची फार वर्षांपासून ख्याती होतीच. मनीषा पाटणकर यांनी माहिती व जनसंपर्क खात्याचा कार्यभार सांभाळल्यापासून त्यांनी लोकराज्यला एक ग्ल्यामरस स्वरूप दिले व आज त्याचा खप विक्रमी आहे. १९९५ मध्ये युतीचे सरकार आल्यावर लोकराज्यचे नाव बदलून ' शिवराज्य ' ठेवण्यात आले होते . मात्र हे नामांतर औट घटकेचे ठरले व २००० मध्ये आघाडीचे सरकार आल्यावर पुन्हा लोकराज्य हे नाव देण्यात आले. आता पुन्हा लोकाराज्यचे नामांतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फक्त आता एवढेच पहायचे आहे की आता नामांतर झाल्यास लोकराज्यचे नवीन नाव काय ठेवण्यात येइल. १९९५ मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री होता म्हणून शिवराज्य नाव ठेवण्यात आले होते. आता भाजपचा मुख्यमंत्री आहे तेंव्हा बहुधा " रामराज्य " ठेवले जाण्याची शक्यता वाटते आहे. हे नाव सुचविल्याबद्दल मला कदाचित रोख पुरस्कार मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: