गुरुवार, २९ जानेवारी, २०१५

येऱ्यागबाळ्यानो एकतर स्मार्ट व्हा किंवा स्वेच्छामरणाला तयार राहा.


भारतातील शंभर शहरांना चुणचुणीत(स्मार्ट) बनवणार आहेत म्हणे. मग या शंभर शहारातील बावळट, येऱ्यागबाळ्यांनी कुठे जावे. कारण अशा चुणचुणीत शहरांमध्ये राहायला बँकेत भरघोस श्रीशिल्लक किंवा स्नानगृहात दडवलेला काळा पैसा किंवा मग "वेतन आयोगी" पगार तरी हवा . असा लक्ष्मीचा वरदहस्त नसलेले झोपडपट्टीत  राहणारे, कनिष्ठ मध्यमवर्गिय, वेतन आयोगानुसार पगार न मिळवणारे यांनी कुठे जायचे ? ज्यांना लांड्यालबाड्या करून अमाप धनसंचय करणे जमत नाही त्यांच्यासाठी या चुणचुणीत शहरांमध्ये जागा असणार नाही हे निश्चित. त्यापेक्षा अशा ओव्हर स्मार्ट लोकांसाठी "लवासा" किंवा "अम्बी व्ह्याली " सारखी अभयारण्ये काय वाईट आहेत. किंवा मग निकामी, भाकड ज्येष्ठ नागरिकांची अडगळ इतर चुणचुणीत लोकांसाठी अडगळ ठरू नये म्हणून ज्याप्रमाणे म्हाताऱ्यान्साठी वृद्धाश्रम असतात तसे या चुणचुणीत नसलेल्या लोकांसाठी "येऱ्यागबाळ्याश्रम" किंवा "गरीबाश्रम " उभारणेच श्रेयस्कर राहील. सध्या पाणी बारा रुपये लिटर या भावाने विकत घेऊन प्यावे लागते. या चुणचुणीत शहरांमध्ये श्वासोच्छवास करण्यासाठी प्राणवायूसुद्धा विकत घेण्याची वेळ येऊ शकते. बऱ्याच शहरांमध्ये ऑक्सिजन पार्लर सुरु झाले आहेत असे मी काही दिवसांपूर्वीच वाचले होते. ज्यामंडळींना परवडते ते अशा पार्लर्स मध्ये अधूनमधून जाउन फुफ्फुसांमध्ये शुध्द हवा भरून घेतात म्हणे. सरकारने आता तलाव, नद्या, जंगले डोंगर विकणे सुरु केले आहेच. देवेंद्र सरकारने तर आता अगदी नद्यांजवळ सुध्द प्रदूषणकारी उद्योग सुरु करायला मोकळीक दिली आहे. विशेष म्हणजे मायबाप सरकार शंभर शहरांना स्मार्ट तर बनविणार आहे आणि सोबतच अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, सध्या अस्तित्वात असलेल्या झोपडपट्ट्या सुद्धा नियमित करणार आहे. म्हणजे अंड तसेच शाबूत ठेऊन जनतेला आम्लेटसुद्धा खाऊ घालणार आहे. हे लबाडाचे निमंत्रण आहे की काय अशी शंका यायला लागली आहे. तेंव्हा येऱ्यागबाळ्यानो एकतर स्मार्ट व्हा किंवा स्वेच्छामरणाला तयार राहा.राजेंद्र कडूमक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: