मंगळवार, ८ डिसेंबर, २०१५




हे आमचे  लोकप्रतिनिधी, कायद्याचे रक्षक.  ……….

सूचनेनंतरही मंत्री, आमदार मोबाइलवर मग्न.

विधानसभेत अध्यक्षांनी दिली तंबी, तरी 'पहिले पाढे' कायम.

सभागृहाचे कामकाज सुरू असताना सर्व सदस्यांनी त्याकडे गंभीरतेने लक्ष देणे आवश्यक असते. परंतु अनेक आमदार एकमेकांशी गप्पा मारण्यात मग्न असतात, आपली जागा सोडून कोणीही कोठेही बसतो त्यामुळे अध्यक्षांना अनेकदा सदस्यांना तंबी द्यावी लागते. परंतु याचा काहीही परिणाम सदस्यांवर होत नसल्याचे सोमवारी पुन्हा एकदा विधानसभेत दिसून आले. सतत मोबाइलवर असलेल्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढण्याची सक्त ताकीद दिल्यानंतरही अनेक सदस्य मोबाइलशी खेळत असल्याचे दिसून आले.

सोमवारी हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या माजी सदस्यांच्या निधनानिमित्त शोक प्रस्ताव मांडला आणि ते शोक संवेदना प्रकट करत होते. परंतु या वेळेस सभागृहातील अनेक सदस्य मोबाइलवर व्हॉट्सअॅप मेसेज पाहत होते, तर काही जण मेसेज पाठवत होते आणि काही जण बोलतही होते. गिरीश महाजन आणि बबनराव लोणीकर तर सतत मोबाइलवरच दंग होते. यांच्यासोबत राधाकृष्ण विखेपाटील, दिलीप कांबळे, मेधा कुलकर्णी, अतुल भातखळकर, छगन भुजबळ, दीपक सावंत, प्रकाश मेहता, भास्कर जाधव, धैर्यशील पाटील आदी सदस्यही मोबाइलवर रममाण झाल्याचे दिसून आले. यापैकी कोणाचेही शोक प्रस्तावाकडे लक्ष नव्हते. गिरीश महाजन तर वाकून मोबाइलवर बोलत होते.
अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी सदस्यांना सक्त ताकीद देत म्हटले की, सदस्यांनी सभागृहात मोबाइलचा वापर करू नये. मोबाइलचा वापर करताना कोणी आढळला तर त्याला सभागृहाबाहेर काढण्यात येईल. परंतु अध्यक्षांच्या या सूचनेचा कोणावरही परिणाम झालेला दिसला नाही.
यानंतरही अनेक सदस्य पुन्हा मोबाइलवर रममाण झाल्याचे दिसत होते. एकूणच सदस्यांना सभागृहाच्या कामकाजापेक्षा मोबाइल पाहण्यातच जास्त रस होता हे दिसून आले.(divyamarathi)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: